परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मुरूम कडकडीत बंद
० सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
मुरूम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) :
परभणी येथील घटनेत पोलीसांनी केलेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी व संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यास कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणीचे निवेदन रविवारी (ता. १५) रोजी मुरूम येथील संविधान प्रेमी भीमसैनिकांकडून प्रशासनाला देवून मुरूम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यात मुरूम येथील संविधान प्रेमी, भीमसैनिक यांच्यावतीने मुरूम सोमवारी (ता. १६) रोजी बंद पुकारून शहरात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचा समारोप करून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना घटनेच्या निषेधाचे व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरकार भिमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे किरण गायकवाड, सुरज कांबळे यांच्यासह असंख्य संविधान प्रेमी भीमसैनिक उपस्थित होते. मोर्चेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे परभणी येथील घटनेत पोलीसांनी केलेल्या मारहाणीत मृत्युमुखी पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने शहर कडकडीत बंद.