
म्हसवड. (प्रतिनिधी )-
म्हसवड नगरपालिका हद्दीतील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन प्रा. विश्वंभर बाबर यांनी सातारचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांना सातारा कार्यालयात समक्ष दिले आहे. म्हसवड येथील चांदणी चौक, पोलीस स्टेशन ते शिक्षक कॉलनी या रस्त्याची दुरुस्तीच्या नावाखाली प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेले अनेक महिने काम करण्याच्या नावाखाली रस्ता, अर्धवट उकरून ठेवलेला आहे. वरचेवर होणारा पाऊस व अपुरा रस्ता, त्यातच रस्त्या मध्येच असणारे सार्वजनिक वीजपुरवठ्याचे पोल या व इत्यादी कारणामुळे प्रवासी, वाहनधारक व स्थानिक रहिवासी यांची प्रचंड कोंडी होत आहे. मुख्याधिकारी म्हसवड म्हणतात सदर रस्त्याचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतोय नगरपालिकेच्या पिण्याची पाईपलाईन या रस्त्यामधूनच असल्याने रस्त्याचे काम करणे आमच्यासाठी अडचणीची आहे, भविष्यात पाईपलाईन लिकेज झाल्यास पुन्हा रस्ता फोडायचा का ?. नगरपालिकाआम्हाला सहकार्य करीत नाही. त्याबरोबरच या रस्त्याच्या मध्यभागी एमएसईबी चे विद्युत पुरवठ्याचे पोल उभे आहेत. एम एस ई बी च्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला असता ते म्हणतात सदर पोलचे रिप्लेसमेंट करण्यासाठी आमच्याकडे बांधकाम विभाग अथवा नगरपालिकेने पैसे भरणे गरजेचे आहे. तसेच सदर पोल नव्याने उभे करण्यासाठी नगरपालिकेने सुयोग्य जागा मिळणे कामी सहकार्य करणे गरजेचे आहे. शासनाच्या या तीन विभागाच्या अडमुठेपणामुळे तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने रस्त्याचे काम गेले तीन महिने रखडलेले आहे. तीनही विभागाच्या आडमुठे धोरणाचा फटका सामान्य नागरिक, स्थानिक रहिवासी व प्रवाशांना प्रचंड प्रमाणात होत आहे. अक्षरशहा जनतेतील भावना तीव्र झाल्या असून केवळ उद्रेकच बाकी आहे. पाऊस झाल्यावर या रस्त्यावरून ये जा करताना अक्षरशा जीव मुठीत धरून प्रवासा करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरच चार शिक्षण संस्थेतील सात हजार विद्यार्थी, परिसरातील दहा गावे व वाडी वस्ती वरील नागरिक , तसेच म्हसवड पोलीस कार्यालय तसेच बुधवारचा भला मोठा जनावरांचा बाजार असल्याने नादुरुस्त रस्त्यामुळे वाहतूक कोंडी व प्रचंड गैरसोईचा फटका जनसामान्यांना बसत आहे. पावसामुळे होणारा चिखल, अर्धा रस्ता खोदलेला मध्येच विद्युत खांब यामुळे प्रवाशांची व वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत असून त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे.
या रस्त्याच्या खोदकामामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुद्धा अनेक ठिकाणी खोदल्यामुळे विस्कळीत झालेली असून त्यामुळे पाणीपुरवठ्यातही मोठा खंड पडलेला आहे. या परिसरातील लोकांना दहा ते पंधरा दिवस झाले पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
सदर तीन शासकीय विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची मागणी कृषिरत्न प्रा. विश्वभर बाबर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्राध्यापक बाबर यांना दिले आहे.