म्हसवड (दि. 2)
नांदणी येथील सर्वांच्या लाडक्या ‘माधुरी’ हत्तीणीला पेठा संघटनेद्वारे गुजरातकडे हलविण्यात आल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर म्हसवड येथील समस्त जैन समाजाने एकत्र येत संतप्त प्रतिक्रिया नोंदवत रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले आणि तहसीलदार बाबर यांना निवेदन सादर केले.
माधुरी हत्तीणी ही केवळ एक प्राणी नसून, ती जैन समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनली आहे. प्रत्येक पर्वणी, रथयात्रा, मिरवणूक किंवा धार्मिक सोहळ्यासाठी नांदणीहून खास माधुरीला पाचारण केले जाई. तिच्या आगमनावेळी संपूर्ण म्हसवड शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण होत असे. बालगोपाळांची तिच्याभोवती गर्दी होत असे आणि तिच्या सोंडेचा चा आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक उत्सुकतेने वाट पाहत.
मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता माधुरीची गुजरातला अचानक रवानगी करण्यात आली. ही बाब उघड होताच प्राणी प्रेमींमध्ये, विशेषतः जैन समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. “माधुरी आमच्या भावनिक जगण्याचा भाग आहे, तिच्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण वाटतात,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
या विरोधात म्हसवड शहरात जैन समाजातील शेकडो नागरिकांनी फेरी काढून शांततेत निषेध व्यक्त केला. महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हे आंदोलन फक्त जैन समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण म्हसवडकरांच्या हृदयातील माधुरीवरील प्रेमाचे प्रतीक ठरले.
शासनाने तातडीने लक्ष घालून माधुरी हत्तीणीला परत नांदणी येथे आणावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

फोटो: जैन समाजातील महिला आणि पुरुष नागरिक तहसील कार्यालयात निवेदन देताना. (तहसीलदार बाबर उपस्थित)