दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
:मस्साजोगची पुनरावृत्ती असलेल्या संजय करचे खंडणी व खून प्रकरणात वडूज जिल्हा सातारा पोलिस आरोपीना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा निवेदन सातारा पोलिस अधीक्षक यांना दिले.
संजय पांडुरंग करचे राहणार पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे दिनांक १५/०६/२०२५ रोजी नातेपुते येथून सांगलीकडे आपल्या पिकअप वाहनातून कांदे घेऊन जात असताना खटाव तालुक्यातील बनपुरी या गावी त्या परिसरातील काही गावगुंडांनी त्यांच्या गाडीला दुचाकी गाडी आडवी मारून तू आम्हाला कट का मारलास, आमच्या लोकांना लागलं आहे. असे म्हणत दवाखान्यात जाण्यासाठी खर्चासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. परंतु संजय करचे यांनी ही मागणी मान्य केली नाही. व आपली गाडी सांगलीकडे मार्गस्थ केली असता त्या गावागुंडानी आपल्या काही सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेऊन संजय करचे यांची गाडी अडवून पैशाची मागणी केली. आणि त्यांनी नकार देताच सुमारे १० ते १५ लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा पाय मोडला. संजय करचे यांच्या छातीवर त्या लोकांनी एवढ्या उड्या मारल्या कि त्यांच्या छातीच्या पिंजरा अक्षरशः मोडला. त्यांचा गुडघा मोडला. त्यांनंतरही त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाथा, बुक्क्या, दगड याच्या साह्याने अगदी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरणही त्या गावागुंडांनी केले आहे.या मारहाणी वेळी त्या परिसरातील एक पोलीस पाटील उपस्थित होते. या अमानुष मारहाणीमुळे संजय करचे यांचा ग्रामीण रुग्णालय म्हसवड येथे उपचारदरम्यान मृत्यू झाला.

कै. संजय पांडुरंग करचे यांच्या पाठीमागे पत्नी, वृद्ध वडील व दोन मुली आहेत. ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते.
कै संजय पांडुरंग करचे यांचा खंडणीसाठी केलेला हा निर्घृण खून असून ही मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. एवढ्या गंभीर प्रकरणाची फिर्याद द्यायला गेलेल्या करचे कुटुंबियांना वडूज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनावणे यांनी अतिशय हीन वागणूक देऊन दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले व खुनाचा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. करचे कुटुंबीय फिर्याद देण्यासाठी वडूज पोलीस स्टेशनला आले. तेव्हा त्याठिकाणी आरोपींचे १०० ते १५० समर्थक उपस्थित होते. संजय पांडुरंग करचे खून व खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत एकाही आरोपीला वडूज पोलिसांनी अटक केलेली नाही. वडूज पोलीस हे राजकीय दबावापोटी संजय पांडुरंग करचे यांच्या खून्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असून तपासात मुद्दामहून दिरंगाई करत असून या गंभीर खून व खंडणी प्रकरणात आरोपींना मदतच करीत आहेत. म्हणूनच याच्या निषेधार्थ खालील मागण्यासाठी आम्ही सोमवार दि. २३/०६/२०२५ रोजी वडूज तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहोत.
१) कै. संजय पांडुरंग करचे यांचा खून व खंडणी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा.
२) कै. संजय पांडुरंग करचे खून व खंडणी प्रकरणाचा तपास जलद व निष्पक्ष करा.
३) कै.संजय पांडुरंग करचे खून व खंडणी प्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांना हीन वागणूक देणाऱ्या व तपासात मुद्दामहून दिरंगाई करणाऱ्या वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनावणे यांना तात्काळ निलंबित करा.
या मागणीसाठी शुक्रवार दिनांक २०/०६/२०२५ रोजी सातारा पोलीस अधीक्षक डीएसपी व सातारा जिल्हाधिकारी यांना लोणारी समाजातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी सर्वश्री उमाजी नाना ढेंबरे, हरिभाऊ खंडेराव पाटसकर, संदीप होळकर, गणेश चोरगे, पितांबर आटपाडकर, नितीन गळवे, महेश करचे, निलेश शरद चोरगे उपस्थित होते.