सोलापूर वृत्तसेवा …
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले अंत्यदर्शन.

आपल्या समर्पित कार्याने “अरण्यऋषी” म्हणून ख्याती पावलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना आज जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. सोलापूर येथे त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
स्व. मारुती चितमपल्ली यांनी आपल्या अभ्यासातून आणि साहित्यातून सर्वांना सृष्टीची नवी ओळख करून दिली. आज ते देहरूपाने आपल्यात नसले, तरी त्यांच्या चिरंजीव स्मृतींच्या रुपात ते कायम या सृष्टीत असतील.
त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमी सोलापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून श्री चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामाजिक वनीकरण चे अजित शिंदे, मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.