लालपरीच्या आगमनाने वडूज
बस स्थानकाच्या कामालाही
गती मिळावी.
© प्रा. नागनाथ स्वामी,
सचिव,
जागृत ग्राहक राजा संस्था,
महाराष्ट्र राज्य.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वडूज आगारात मोठया दिमाखात लाल परीचे आगमन होत आहे. खटाव करांच्या दृष्टीने हि आनंदाची पर्वणी आहे. नवीन भव्य व अद्यावत बसस्थानकाच्या शुभारंभा साठी हा शुभ शकुन ठरावा हीच तालुक्यातील जनतेची इच्छा आहे.
तसा आज पर्यंत वडूज आगार व बस स्थानका साठी झालेला संघर्ष व लढा अनेकांना अपरिचित आहे. सुमारे 37 वर्षा पूर्वी येथील गोडसे परिवाराने वडूज आगार व बस स्थानकासाठी मोठया मनाने व अपेक्षेने आपल्या मूल्यवान जमिनी दिल्या. पण वडूज करांना एस टी कडून अपेक्षा भंगाशिवाय काहीही मिळाले नाही.
तरीही कोणतीही राजकीय ताकद पाठीशी नसताना तत्कालीन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा विषय हातात घेऊन 1980 साला पासून आंदोलने केली. परिषदेचे राज्य सदस्य व माण – खटाव अध्यक्ष प्रा. नागनाथ स्वामी, पुढारीचे पत्रकार अनिलभाऊ गोडसे, वडूज चे अध्यक्ष रमेश गोडसे ( सध्याचे lic प्रतिनिधी ), महिला संघटक सौ. पदमाताई कुबेर, दहिवडी शहर मंत्री सुभाष पवार, विजय साखरे, धीरज दवे, विकास गायकवाड, मुन्शी शेख या कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ( आज भाजप व विध्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मा. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे , प्रकाश जावडेकर, सुनील मोदी हे आज सत्तेत आहेत. . तेव्हा हे परिषदेचे सामान्य कार्यकर्ते होते. दहिवडीत मुक्कामी असायचे.) तेव्हा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांची टवाळी करून हिणवले, पण कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे व रेट्यामुळे तत्कालीन माणदेश साहित्य संमेलनाचे प्रमुख, आर पी आयचे नेते व परिवहन राज्य मंत्री मा. रामदास आठवले यांना घेराव घालून अर्धवट बांधून तयार असलेला डेपो सुरु करावा अशी आग्रही मागणी केली. अखेर परिषदेच्या प्रयत्नांना यश आले व मा. रामदास आठवले यांनी क्षेत्रीय व्यवस्थापकांना डेपो सुरु करण्याचा आदेश दिला.. व वडूज स्थानकातील उपहार गृहाचे चालक अग्रवाल काका यांचे शुभ हस्ते 13 मे 1993 रात्री 9.30 श्रीफळ वाढवून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वडूज आगाराचा शुभारंभ झाला. त्यानंतर महामंडळा चे तत्कालीन अध्यक्ष पी के अण्णा पाटील यांचे हस्ते व मा. कै.आमदार भाऊसाहेब गुदगे, आ. धोंडीराम वाघमारे, महामंडळ सदस्या शशिकला देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत रीतसर उदघाटन झाले. आणि खटाव करांची सोय झाली. त्यानंतर विदयार्थी परिषद, ग्राहक पंचायत, ग्राहक कल्याण फाऊंडेशन, जागृत ग्राहक राजा व पत्रकार संघ यांनी एकत्र येऊन वडूजचे नवीन सुसज्ज बस स्थानक व्हावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत पण यांनी अजून चिकाटी सोडली नाही. आज लालपरीच्या आगमनाने पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यावेळी आमचे कोणी सत्तेत नव्हते, तरीही प्रयत्नांती डेपो सुरु झाला. आज आमचे सत्तेत आहेत, गेली 37 वर्षे वडूजकर आलिशान बस स्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत.पण स्वप्न अपुरेच राहिले आहे.
खटाव वाशियांनो! फलटणला गरज नव्हती पण पहिले स्टॅन्ड असताना व तशी गरज नसताना ते नव्याने भव्य असे उभे राहिले, बारामतीला तर एस टी महामंडळा ने एस टी स्टॅन्ड नव्हे, तर विमान तळ उभे केले आहे!! मग खटाव च्या जनतेने कुणाचे घोडे मारले आहे? म्हणून गेली 37वर्षे इतर सुधारणा राहूद्यात किमान एक नवीन सुसज्ज स्टॅन्ड उभे राहू शकत नाही? वडूज चे नाव महामंडळाच्या यादीत नाही का? वडूज महाराष्ट्रात नाही का? येथील लोकांनी एवढ्याही अपेक्षा करू नयेत का?
आज लालपरीचे लोकार्पण आपल्या भागाचे लोक प्रतिनिधी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकट वर्तीय मा. ना. जयकुमार गोरे (भाऊ ) यांचे हस्ते होत आहे. त्यांनी शब्द मा. मुख्यमंत्री महोदयांकडे शब्द टाकला तर येत्या सहा महिन्यात वडूजला बारामती सारखे विमान तळा सारखे भव्य, सुसज्ज एस टी स्टॅन्ड उभे करू शकतात!
मा. भाऊ एवढे लवकरात लवकर कराच. अन्यथा मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नुसार ” शासनाने एखादी जागा, ज्या प्रयोजनासाठी घेतली असेल, आणि त्या जागेचा वापर खूप वर्षे त्या प्रयोजनासाठी केला नसेल, तर सदरची जागा मूळ मालकाना परत करावी. ” असे म्हटले आहे. जर या जागा परत करण्याची नामुष्की आली तर यातून एस टी चा आणि सरकारचा नाकर्ते पणा उघडा होणार आहे. एस टी च्या हे लक्षात येत का नाही. एवढी भव्य जागा कुठेच नाही. ही हातची गेली तर महामंडळाला नव्हे, तालुक्यातील जनतेवर हातावर हात चोळत बसण्याची वेळ येणार आहे.
मागण्या करण्यालाही काही मर्यादा असतात, खरे तर एस टी स्टॅन्ड उभारणे ही महामंडळाची स्वतः ची जबाबदारी आहे. मागणी करण्याची गरजच काय?
जुन्या स्टॅंडने खूप सेवा दिली आहे, पण हेच स्टॅन्ड आज मृत्यूचा सापळा बनले आहे. मागील काही वर्षात काही प्रवासी व शाळकरी मुलांना बसखाली जीव गमवावा लागला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे, अनेक चालकांचा दोष नसताना दंड, शिक्षा भोगावी लागली आहे. जीव मुठीत धरून या एस टी चालकांना या मृत्यूच्या सापळ्यातून जावे लागत आहे, इतकी भयावह अवस्था जुन्या स्टॅन्ड ची झाली आहे. अजून किती जीव जाण्याची वाट पाहावी लागणार आहे?
मा. ना. जयकुमार भाऊ, आपल्या पाठीशी खूप मोठी शक्ती आहे. हे काम अगदी सहज करू शकता. आम्ही खटाव वासियांना आपणा कडून मोठी अपेक्षा आहे! बघुद्यात येथील जनतेला भव्य, दिव्य अन सुसज्ज स्टॅन्ड!अन्यथा खटावची जनता सोसतेच आहे…….?