
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
औंध : ऐतिहासिक खटाव तालुक्यातील औंध गावच्या दक्षिणेस श्री केदारेश्वर महादेवाचे देवालय आहे. महाशिवरात्रीनिमित्त औंध तसेच औंध परिसरातील भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे तिथे दिसून आले.
हे मंदिर खूप जुने असून कमीत कमी 600 ते 700 वर्ष या मंदिरास झाले असावेत असा अंदाज वर्तवला जातो.
1768 साली श्री केदारेश्वर महादेवाचे देवालय अगदी जीर्ण झाल्याने श्रीमंत परशुराम पंतप्रतिनिधी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
आज महाशिवरात्रीचा सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भाविकांमध्ये भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.
औंध मधील पुजारी ओंकार आनंदराव गुरव हे केदारेश्वर महादेवाची पूजा ही सकाळी मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने करतात. त्यानंतर दिवसभरामध्ये भाविकांचे अभिषेक घालण्यात येतात.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले असते त्यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारात संपूर्ण औंध गावातून श्री केदारेश्वर महादेवाचे पालखीचे आयोजन करण्यात आलेले असते. त्यानंतर देवाची पाकाळणी करून संध्याकाळी दहाच्या सुमारास भजनाचे सुद्धा आयोजन केलेले असते दुसऱ्या दिवशी देवस्थान तसेच गाव वर्गणीतून भक्तांसाठी खीर वाटपाचे आयोजन करण्यात येते.