एल. के. सरतापे, म्हसवड
कोरोना काळात जेव्हा जगभर भीतीचे वातावरण होते, तेव्हा म्हसवडच्या सुवर्णाताई सुनील पोरे यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर सेवाभावाचा अनोखा आदर्श ठेवला.
रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाश्ता व चहा देऊन धीर देणे, फिरस्ती, अनाथ, वेडसर आणि वृद्धांना अन्नदान करणे, गरीब कुटुंबांना धान्य मदत देणे, सॅनिटायझर व मास्कचे वितरण, आणि “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर आधुनिक रुग्णवाहिका चालवणे — अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी खरं समाजसेवेचं उदाहरण घालून दिलं.
पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी वृक्षारोपण आणि “वृक्षतोड बंद करा” हा संदेश ग्रामीण भागात रुजवला. शुभम भारत गॅसच्या माध्यमातून “घर तेथे गॅस” ही योजना राबवून प्रदूषणमुक्त माणची संकल्पना साकार केली. प्रत्येक गॅस कनेक्शनसोबत एक झाड देण्याची अभिनव कल्पना त्यांनी राबवली — पर्यावरण संरक्षणाचा हा उपक्रम आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
१५ वर्षांपूर्वी माण तालुक्यात गॅस मिळवणे अवघड असताना, त्यांच्या पती सुनील पोरे (बांधकाम विभाग, सातारा) यांनी म्हसवड येथे “शुभम भारत गॅस एजन्सी” सुरु केली आणि तीची सूत्रे सुवर्णाताईंच्या हाती दिली. त्यानंतर सुवर्णाताईंनी महिलांना एकत्र करून पर्यावरण-जागरूकतेसाठी मोठे अभियान उभारले.
महिलांना लघुउद्योगासाठी प्रोत्साहन देत त्यांनी पाककला स्पर्धा, घरगुती पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्याचे उपक्रम राबवले. आरोग्य शिबिर, डोळे व मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबिर, तसेच वारकऱ्यांसाठी मोफत भोजनदान आणि वैद्यकीय तपासणी असे समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सातत्याने केले.
माण तालुक्यातील “पाणी फाउंडेशन” मोहिमेत स्वतः पती सुनिल पोरे व कर्मचारी यांच्यासह श्रमदान करून मदतीचा हात दिला. तसेच म्हसवड येथील संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करून दरवर्षी जयंती सोहळ्याची परंपरा सुरु केली.
एकीकडे समाजकार्य, तर दुसरीकडे कौटुंबिक जबाबदारी — दोन्ही समतोल राखत सुवर्णाताईंनी आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले; एक वकील, एक डॉक्टर आणि एक ऑटोमोबाईल मॅकेनिक — हे त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.
सुवर्णाताई पोरे या फक्त समाजसेविका नाहीत, तर “आधुनिक युगातील दुर्गा” आहेत — ज्या समाजकारण, अध्यात्म, पर्यावरण आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांत प्रकाश टाकतात.
 
							 
		 
		 
		