निवडणूक प्रचारात नसणाऱ्यांना निकालाची चिंता
(अजित जगताप) सातारा दि: सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा दिवस उजाडला आहे. या निवडणुकीमध्ये कुठेही प्रचारात नसणारी मंडळींना आता निकालाची चिंता लागल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील मतदाराची संख्या पाहता या वेळेला ७५ टक्के मतदान होईल असं सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनीही वाहनांची व्यवस्था केली होती . एका गावातील एकाच पक्षाचे चार ते पाच गट असल्याने नेमकं विजयाचे श्रेय कोणी घेऊ नये याची व्यवस्था करण्यात आली होती.तरी ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदानाला आपापल्या गावी जाणाऱ्या मतदारांना सार्वजनिक एसटी वाहतूक सेवा विस्कळीतपणा झाल्यामुळे मतदान करण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे किमान तीन ते पाच टक्के मतदान इच्छा असूनही झालेले नाही. या मतदारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागले होते. मतदानाच्या यंत्रणा वाहतूक करण्यासाठी बऱ्याच एस.टी. बस मतदान केंद्रात गेल्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आपापल्या गावी जाता आले नाही. काहींनी खाजगी वाहने करून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. ते कौतुकास पात्र आहेत. या मतदान केंद्रामध्ये चांगली व्यवस्था झाल्यामुळे ग्रामीण भागात बऱ्यापैकी मतदान झाले. याउलट शहरी भागामध्ये काही ठिकाणी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा सपाटा उमेदवारांनी उघडपणे लावला होता. जेवणाची पाने तीनशे आणि मतदान दोनशे हे सुद्धा पाहण्यास मिळाले. वास्तविक पाहता लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या एक्झिट पोलचा कौल म्हणजे थोतांड असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी व महायुती आणि निवडणुकीचे निकाल बाहेर झाल्यानंतर महायुतीआघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये तथ्य दिसून येणार आहे. पाच वर्षानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार तयारी करणारे राजकीय पक्ष व उमेदवार यांनाच मतदारांनी स्वीकारले आहे . अपक्षांना फारसा वाव मतदार देत नाहीत. हे सुद्धा प्रचार यंत्रणेत दिसून आलेले आहे. पाटण व वाई मतदारसंघात अपक्षांना मिळणाऱ्या मतांमुळे धक्कादायक निकाल लागू शकतो. हे त्रिवार सत्य आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी घराबाहेर न पडणारे काहीजण आता फोना फोनी करून विचारणा करू लागलेले आहेत. अशा लबाडांना विजय मिरवणुकीत सामील करून घेऊ नये .असे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. ————————–
——- महत्वाची चौकट—-प्रसारमाध्यमातून वारे माप जाहिरात बाजी करून सुद्धा ज्यांचा पराभव झाला. त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. याउलट समाज माध्यमावर ज्यांनी योग्यरीत्या प्रचार केला त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे सत्य आहे की नाही? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.