वाचन,चिंतन आणि निरीक्षणातून नवसाहित्यिकांना लेखनाची दिशा मिळते – सुनील दबडे

Spread the love

आटपाडी वार्ताहर
सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे ‘देवनागरी किशोर साहित्य संमेलन’ बालक,पालक व शिक्षकांसाठी उपयुक्त़असून मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक सुनिल दबडे यांनी व्यक्त़ केले.
सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या 32 व्या वर्धापन दिन,विश्व़ हिंदी दिन व स्वर्गीय प्राचार्य भगवानराव बाबर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मंडळाने राष्ट्रभाषानुरागी प्राचार्य भगवानराव बाबर राष्ट्रभाषा भवन तुरची-तासगाव येथे आयोजित केलेल्या खुल्या देवनागरी किशोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दबडे बोलत होते. यावेळी नव्याने साहित्य लेखन करणारे सांगली जिल्ह्यातील शिक्षक,साहित्यिक, विद्य़ार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनिल दबडे पुढे म्हणाले की शिक्षकांनी आणि विद्य़ाथ्यांनी चांगल्या पुस्तकांचे खूप वाचन करावे. वाचनामुळे लेखनाची दिशा मिळते. वाचनामुळे माणसाच्या संपूर्ण आयुष्याला चांगले वळण लागते. वाचन आणि लेखन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लहान मूल जसे रांगत रांगत चालायला शिकते तसा साहित्यिक वाचत वाचत लिहायला शिकतो. वाचनाशिवाय केलेले लेखन पाण्याच्या बुडबड्यासारखे असते.श्व़ासाशिवाय माणूस जगू शकत नाही. तसा वाचनाशिवाय साहित्यिक लिहू शकत नाही. नव्याने लिहू पाहणाऱ्या कवी लेखकाने वाचनाबरोबरच लेखनाची तंत्रेही अवगत करावी.
यावेळी बोलताना दबडे पुढे म्हणाले की “मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची मनं बधीर झाली आहेत. वाचनाकडे आणि खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक पालक नोकरी धंद्य़ाच्या मागे आहेत. नव्या नव्या वस्तूंनी घरं भरून गेली आहेत.घरातली आई सायंकाळच्या वेळेला दूरदर्शनवरील मालिका बघायला व्यस्त! वडील मोबाईलवर लॅपटॉप वर दंग!! घरातला मोठा भाऊ, बहिण चॅटिंग मध्ये गुंग!!! घरातील अशा वातावरणामुळे आपापसात संवाद कमी झाला आहे. त्यामुळे लहान मुलांचे बालपण हरवलं आहे. घरपण संपत चाललेली घरं आणि तुटत,फाटत चाललेली मनं! अशी अनेक घरांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. घराला घरपण आणण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधा. त्यांना वेळ व प्रेम द्य़ा. त्यांच्या हातात पुस्तक द्य़ा. शिक्षकानी शाळेत विद्य़ार्थ्यांची आई व्हा’. असे मत यावेळी बोलताना दबडे यांनी व्यक्त़ केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक सुनिल दबडे पुढे म्हणाले की ‘मराठी साहित्यात आजपर्यंत ज्येष्ठ शिक्षक साहित्यिकांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. ओला- सुका दुष्काळ, शेतीमालाचे गडगडलेले भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रीभृणहत्या,महिलांची असुरक्षितता,बेरोजगारी,गुंडगिरी, ग्रामीण भागात फोफावणारी अंधश्रद्ध़ा, दूषित राजकारण, व्यसनाधीनता,गावागावात लग्नविना राहिलेली व वय वाढलेली पोरं या व अशा अनेक प्रश्नांमुळे समाजात अस्वस्थता दिसून येते आहे. शिक्षक साहित्यकांनी लेखन करताना अशा अस्वस्थ वर्तमानाचा वेध आपल्या लेखनातून घ्यावा.असे आवाहन यावेळी दबडे यांनी उपस्थित नवलेखकाना केले.
संमेलनाच्या सुरुवातीला सुनिल दबडे यांच्या हस्ते प्राचार्य भगवानराव बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घ़ाटन करण्यात आले..हिंदी मंडळाचे ज्येष्ठ विश्व़स्त जयवंत दबडे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक सुनिल दबडे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आडसुळ यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात शिक्षक व विद्य़ार्थ्यांच्या काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. काव्य स्पर्धेतील विजेत्यांचे व हिंदी मंडळाने वर्षभर घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारोपाच्या कार्यक्रमात करण्यात आले.काव्य स्पर्धांचे परीक्षण कवी किशोर दीपंकर व उत्कृष्ट निबंधकार उदयकुमार गवळी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा हिंदी मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती सुजाता मोरे, उपाध्यक्ष नंदकुमार खंडागळे,कार्यवाह निवृत्त़ी शिंदे,सहकार्यवाह उदयकुमार गवळी,जिल्हा कार्यकारणी विश्व़स्त बाळासाहेब गुरव व आप्पासो पाटील,आटपाडी तालुका हिंदी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कदम,तासगाव तालुका हिंदी संघटनेच्या सदस्या श्रीमती शारदा यादव,तासगाव तालुका हिंदी संघटनेचे सदस्य रमेश चव्हाण, बाळासाहेब शेंडगे व सौ.ज्योती कोगनोळे, वाळवा तालुका हिंदी संघटनेचे सद,स्य विकास शेटे व श्रीकांत देशमुख, मिरज तालुका हिंदी संघटनेचे सदस्य सतीश कांबळे मंडल के हितैषी वि.रा.पाटील, शिक्षक,पालक व विद्य़ार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कवी किशोर दीपंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे केले. शेवटी वंदे मातरम गीताने समारोहाची सांगता झाली.
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!