
म्हसवड… प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढल्याने माण तालुक्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत चा लक्षांक वाढवून देण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी कृषिमंत्री नामदार कोकाटे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त महासंघ शेतकरी पदाधिकारी शिष्टमंडळाची बैठक नुकतीच मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाली . यावेळी महाराष्ट्राचे कृषिमंत्री माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांना कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी माण तालुक्यातील कृषीविषयक मागणीचे निवेदन दिले .
यावेळी महाराष्ट्राचे प्रधान कृषी सचिव
विकासचंद्र रस्तोगी , कृषी आयुक्त सुरज मांढरे तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी माण तालुका हा दुर्लक्षित व दुष्काळी समजला जात होता. सध्या माण तालुक्यात विविध योजनांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध झालेले आहे तसेच यावर्षी पाऊस चांगला झाल्याचे प्रा.बाबर यांनी बैठकीत सांगितले . तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढलेला आहे. प्रामुख्याने आंबा, डाळिंब, द्राक्ष इत्यादी फळबाग लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र माण तालुक्यात कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीचा लक्षांक शेतकऱ्यांच्या मागणीपेक्षा खूपच कमी असल्याचे प्रा. बाबर यांनी मंत्री महोदय यांच्यापुढे सांगितले. तालुक्यात शेततळी बांधण्याला प्राधान्य द्यावे तसेच त्याचे अस्तरीकरणासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कृषीमंत्र्यांनी मागणीच्या निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश वरिष्ठ शासकीय यंत्रणेला केले. फळबाग लागवडीचा इष्टांक वाढवून दिल्यास माण तालुक्यात फळपीक लागवडीला चालना मिळेल असा विश्वास विश्वंभर बाबर यांनी व्यक्त केला.