


क्रांतिवीर संकुल माण चे शैक्षणिक ओयासिस…… महादेवराव जानकर
म्हसवड… प्रतिनिधी
दुष्काळी माण तालुक्यातील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड हे या पंचक्रोशी साठी शैक्षणिक ओयासिस असून त्यास उज्वल भवितव्य आहे असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी व्यक्त केला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर , प्राचार्य विन्सेंट जॉन, व संकुलातील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले तत्कालीन वेळी ज्या इमारतीच्या भूमिपूजनाचा मी नारळ फोडला ती इमारत पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे. ही केवळ इमारत नाही तर क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ज्ञानमंदिर आहे. इवलेसे रोप लावियेले दारी त्याचा वेलू चालला गगनावरी हा प्रत्यय आल्याचे जानकर यांनी सांगितले. सर्व शैक्षणिक सोयीनी युक्त इमारत ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण पर्वणी असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपला आहे. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल नावाप्रमाणे क्रांतिकारी व उपक्रमशील आहे. या माध्यमातून शेकडो सनदी अधिकारी व आदर्श नागरिक घडतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी बाबर दांपत्याच्या कार्याचा गौरव केला. ॲड. इंद्रजीत बाबर यांच्या हस्ते महादेव जानकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आकाश विरकर, युवराज विरकर, बाळासाहेब डोंगरे, किरण पुकळे, संकुलातील शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार चंद्रकांत तोरणे यांनी व्यक्त केले.