…
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज: नगरपंचायत स्थापने नंतर काही दिवसात जागा अपुरी पडू लागल्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी जुन्या तहसिल कार्यालयाच्या इमारतीत नाममात्र भाडेतत्त्वावर स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या ही जागा भव्य, प्रशस्त व पुरेशी असून अभ्यागताना अत्यंत सोयीची आहे व येथे कोणतीही समस्या अथवा अडचण होत नाही. या जागेबद्दल नागरिक समाधानी आहेत, शिवाय या जागे बद्दल कोणाचीही काहीही तक्रार नाही. असे असताना सुद्धा मुद्दाम सदरचे वडूज नगर पंचायत कार्यालय काहीही कारण नसताना या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारतीत हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.वडूज नगर पंचायत कार्यालय स्थलांतराचा घाट घालू नये असा इशारा येथील जनसंघर्ष समितीने दिला आहे.
तहसिलदार बाई माने यांना लेखी निवेदन देण्यात आले.याप्रसंगी डॉ.संतोष. गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार शिंदे, माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे, राजेंद्र माने, राहूल सजगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ऐतिहासिक वास्तू असलेल्या जुन्या लोकल बोर्ड कार्यालय नेहण्याचा घाट घातला जात आहे. त्या जुन्या कोर्टाच्या सद्यस्थितीतील जिल्हा परिषद बांधकाम विभाग जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे असे खात्रीशीर वृत्त समजते. वास्तविक नगरपंचायतीला स्व मालकीचे कार्यालय असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आता जेथे नगर पंचायत कार्यालय आहे, ती जुन्या तहसील कार्यालयाची इमारत व जागा वडूज नगर पंचायतीस मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यमान नगर सेवकांनी सुध्दा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या नाममात्र भाडे असताना त्याठिकाणी जाऊन पुन्हा भाडेतत्त्वावर राहणे हे कितपत योग्य आहे. तसेच नगरविकास खाते व ग्राम विकास खाते ही स्वतंत्र यंत्रणा असताना राज्य शासनाने केलेला अध्यादेश विरोधाभास दर्शवतो.
जुन्या तहसिल कार्यालयात नाममात्र भाडे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या इमारतीत पुन्हा भाडेतत्त्वावर स्थलांतरीत होऊ नये.अशा आशयाचे निवेदन तहसिलदार बाई माने, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पंचायत समिती, नगरपंचायत आणि वडूज पोलिस ठाणे यांना देण्यात आले आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता याबाबत वडूजमधील नागरिकांची मते जाणून घ्यावीत. तसेच वडूज नगर पंचायत कार्यालय आता ज्या जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत आहे, तेथेच कायम असावे. त्याचे स्थलांतर करू नये. अशी नागरिकांची प्रामाणिक इच्छा आहे. तरी संबंधितांनी सारा सार विचार करून कार्यालय
स्थलांतरित करण्यात मान्यता देऊ नये. कोणाच्या तरी हट्टापोटि या ठिकाणावरून नगरपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास वडूज जनसंघर्ष समिती कडून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने केली जातील व यावेळी कायदा व सुव्यवस्था बाबत होणाऱ्या परीस्थितीस नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील याची गंभीर दखल घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला.
फोटो: तहसीलदार बाई माने यांना निवेदन देताना डॉ.संतोष गोडसे,उपसभापती विजयकुमार शिंदे, माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे व इतर