म्हसवड
(महेश कांबळे / म्हसवड, माण)–
रेडिओ स्टार म्हसवड येथील प्रसिद्ध सनई वादक बाबुराव धुमाळ यांचे दुःखद निधन झाले.

सातारा जिल्ह्याला जसा फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, तसाच वारसा याच जिल्ह्यातील माण तालुक्याला लाभलेला आहे. माण तालुका हा ग्रामीण व दुष्काळी असला तरी येथील मातीने आजवर अनेक नररत्नांना जन्माला घातले आहे, या मातीने राज्याच्या प्रशासनाला आजवर अनेक अधिकारी दिलेत, खेळाडु घडवलेत त्याप्रमाणेच अनेक कलावंतही घडवलेत, मात्र अधिकारी व खेळाडु हे नेहमी प्रसिध्दीच्या झोतात राहिले पण कलावंत मात्र आपला फाटलेला संसार शिवण्यातच मग्न राहिले. अंगी फार मोठी कला असताना देखील केवळ परिस्थिती अभावी हे कलाकार मातीमोल झालेत त्यांना कधी प्रसिध्दीच्या झगमटात राहताच आले नाही. असाच एक ग्रामीण कलावंत दि.३० जुन रोजी मातीमोल झाला.
आजचे जग हे डिजीटल युग मानले जाते याच डिजीटल युगात पाश्चात्य संगिताने संगित क्षेत्र ही हादरुन गेले आहे, रिमिक्स व डीजे च्या या जमान्यात पारंपारिक वाद्याची कला जोपासणारे कलाकार हे दुर्मीळच याच पारंपरिक वाद्यापैकी सनई एक असे वाद्य आहे की जे सर्वच ठिकाणी चालते, एखाद्याचे मंगल कार्य असो अथवा मृत कार्य असो सनई ही आलीच याच सनईला आपल्या जगण्याचा आधार बनवुन जगणार्या म्हसवड येथील कलाकार बाबुराव जगन्नाथ धुमाळ यांनी संपूर्ण आयुष्य सनई वादकाचे काम केले, सनईवादकाचे काम करताना त्यांना थोडेफार पैसे मिळायचे पण प्रसिध्दी मात्र कधी मिळालीच नाही मुंबईचा गणपती असो अथवा कोकणातील दुर्गात्सोव असो बाबुराव धुमाळांना नेहमीच आमंत्रित केले जायचे पारंपरिक वाद्यांचा वारसा जपत या कलाकाराने अनेकांना या वाद्याने मोहित केले खरे पण आर्थिक परिस्थिती मुळे हा कलाकार शासकीय अनेक लाभापासुन वंचित राहिला बदलत्या काळातही पारंपरिक कला जोपासणारा हा ग्रामीण कलाकार काळाच्या पदड्याआड गेला खरा व त्यांच्यासोबतच सनईचा सुमधुर आवाजही लोप पावल्याची भावना कलाकार मंडळीतुन व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे, तर ग्रामीण भागातील संगित क्षेत्रातील एक हिरा हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे.