Advertisement

महाराष्ट्रात नासप च्या सहकार्याने विचाराने काम करणार- राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे

समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय:


अमरावती:
आ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे यांनी समाजाच्या विकासासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. पारंपरिक टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

भास्करराव टोम्पे यांची सर्वसंमतीने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नुकत्याच झालेल्या उजंबवाडीत महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. महासंघाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून 18 राज्यांमध्ये तो कार्यरत आहे. 2027 पर्यंत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या वेळी नामदेव समाजोन्नती परिषदचे सरचिटणीस डॉक्टर अजय फुटाणे, सातारा जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे केशवराज संस्था अध्यक्ष बाळ आंबेकर सहचिटणीस शित्रे, पुणे सरचिटणीस सुभाष मुळे पिंपरी चिंचवड अध्यक्ष एकनाथ सदावर्ते प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे यांचेसह अठरा राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते

टोम्पे यांनी संत नामदेव महाराजांचे योगदान अधोरेखित करत पंढरपूर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त केला. सरकारने या स्मारकासाठी कोठ्यावधी रुपये मंजूर केले असून लवकरच यासाठी प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाचा विकास व धोरणात्मक मागण्या:
समाजातील 90 टक्के लोक गरीबीरेषेखाली असून त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये 2 टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी टोम्पे यांनी केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसारखे उपक्रम राबवून त्यांनी समाजाला प्रोत्साहन दिले आहे.

यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुमारे एक लाख प्रतिनिधी सहभागी होतील. समाजातील तरुण आणि महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील.

टोम्पे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समाजाच्या समस्या मांडण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय स्तरावर समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

टोम्पे म्हणाले, “एकात्मतेत मोठी ताकद आहे. समाज एकत्र येऊनच पुढे जाईल.” त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देत महिला, विधवा, विधुर आणि घटस्फोटितांसाठी सामूहिक विवाह परिषदा घेतल्या आहेत.

महाराष्ट्रात नासप चे सहकार्याने विचाराने काम करणार असल्याचे सांगून …सातारा जिल्ह्यातील इंजि सुनील पोरे यांनी केलेले कामाची भास्करराव टोम्पे यांनी प्रशसा केली

भास्करराव टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली आभा नामदेव क्षत्रिय महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शैक्षणिक परिवर्तनाचा पाया सावित्रीबाईंनी घातला-सुलोचना बाबर


म्हसवड.. प्रतिनिधी
तत्कालीन वेळी समाज अज्ञानरूपी अंधारात असताना सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया घातल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे बालिका दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सुलोचना बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बाबर म्हणाल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मोहीम रुजवली. समाजातील विकृत प्रवृत्तीने अनेक वेळा सावित्रीबाईंना अपमानित केले , मात्र त्या डगमगल्या नाहीत. शिक्षण हेच प्रगतीचे साधन असल्याने, सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाची गरज ओळखली व त्याद्वारे प्रगतीचे पाऊल टाकले. या निमित्ताने सुलोचना बाबर यांनी सावित्रीबाईंच्या जीवन पटाची तपशीलवारपणे माहिती उपस्थितताना देऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने पुनम जाधव , प्रांजल लुबाळ , समीक्षा बारवासे यांनी मनोगत केले तर मोहिनी राजगे हिने सावित्रीच्या ओव्या कथन केल्या. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन रोहिणी काटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार साधना दुधाळ यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान ग्राम सडक योजना कामांत गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्य देणार – ना.जयकुमार गोरे

पंतप्रधान ग्राम सडक योजना कामांत गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्य देणार – ना.जयकुमार गोरे

सातारा वार्ताहर

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिमंडळाच्या सचिव व अधिकारी यांची बैठक घेऊन महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजना याबाबत चर्चा केली व कामाचा दर्जा सुधारण्यासाठी काय उपाय योजना करता येईल याबाबत चर्चा केली.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली.
यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी आदी उपस्थित होते.

म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु

म्हसवड (वार्ताहर)..

म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु.- अध्यक्ष नितिन दोशी यांची माहिती.
दि. म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयामध्ये दि. 01/01/2025 ते 15/01/2025 या कालावधीत वाचन संकल्पाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांचे सुचनेप्रमाणे येथील वाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु करणेत आल्याची माहिती मोफत नगर वाचनालायाचे अध्यक्ष व म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी दिली.
वाचनालयातील सर्व पुस्तकांची, इमारतीची स्वच्छता करण्यात आली तसेच पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचा असंख्य साहित्यप्रेमी लाभ घेतला.
वाचनालायची गोडी निर्माण व्हावी व वाचकांनी ग्रंथालयाकडे वळावे यासाठी असे उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी विषद केले.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक श्री प्रशांत सूळ साहेब,सिद्धनाथ हायस्कुल व ज्यूनी. कॉलेज चे वाचनालायचे ग्रंथपाल श्री भारत पिसे सर, डॉ. दोशी, लोखंडे, विपुल व्होरा, मोफत नगर वाचनालयाचे ग्रंथपाल श्री सुनिल राऊत व म्हसवड मधील सुजाण वाचक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे फेडले पारणे

  • महात्मा जोतिबा फुले प्राथमिक वडूज शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
    प्रतिनिधी वडूज -विनोद लोहार

वडूज : येथील वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज संचलित महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
सदर कार्यक्रमा दरम्यान वडूज शिक्षण मंडळाचे सर्व संचालक , हुतात्मा परशुराम विद्यालयाचे प्राचार्य डी.जे.फडतरे , पर्यवेक्षक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध गुणदर्शनात नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कराओके ट्रॅकवर गीत मंचाने स्वागत गीत सादर केले. तर महाराष्ट्राची लोककलेची परंपरा जोपासत विद्यार्थ्यांनींनी गवळण, लावणी, लोकनृत्य, शेतकरी नृत्य, कोळी गीते , वाघ्या मुरळी डान्स, देशभक्तीपर गीते या गीतांचा अविष्कार साजर केला. याचबरोबर बॉलीवूड रिमिक्स गाणी ,साऊथ इंडियन नृत्य अशा विविध प्रकारच्या गीतां बरोबरच राज्यातच नव्हे तर देशभर वाहनांची वाढलेली गर्दी नियमांचे पालन करून कशी कमी करावी याविषयीची एक ट्राफिक रूल्स ही इंग्रजी नाटिका यावेळी विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित प्रेक्षकांना व मान्यवरांना अचिंबित केले. दैनंदिन जीवनात समाजामध्ये प्रबोधन करण्याची गरज असल्याचे या लहान चिमुकल्यांनी समाज प्रबोधनकार नाटके सादर करून हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याने कार्यक्रमात रंगत आली. उपस्थितांकडून या लहान विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक करण्यात आले. जवळपास चार तास चाललेल्या या विविध गुणदर्शन कार्यक्रमातील सुत्र संचालन विद्यार्थ्यानीं केले व विविध कलाविष्काराने विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे व मान्यवरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यामुळे उत्साहित झालेल्या प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांवर बक्षिसांची सरबत्ती केली .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका शितल शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी सतीश पवार, सुवर्णा लोहार ,मनीषा खाडे ,सुजाता जाधव , संज्योती पवार, मिलन देशपांडे ,दिपाली टाकणे ,कल्पना यादव , शिवानी पवार या सहकार्यांनी योगदान दिले. सदर कार्यक्रमाचे धावते सूत्रसंचालन आशुतोष गवळी यांनी केले तर आभार विजया खराडे यांनी मानले .

फोटो : महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य सादरीकरण करता दुसरी तील विद्यार्थी ( विनोद लोहार)

म्हसवड पोलीस नावालाच, बाजारात व्यापारी त्रस्त!

दुचाकीचा भार, व्यापार्यांचे हाल, अठवडा बाजारातील बोलके चित्र

म्हसवड दि. १
माण तालुक्यात सर्वात मोठा अठवडी बाजार म्हसवड या शहरात भरतो या अठवडी बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने शहराच्या अर्थकारणास यामुळे मोठी ‌मदत होत आहे, असे असले तरी सध्या हा अठवडा बाजार दुचाकीमुळे वेगळ्याच चर्चेत आला असुन अठवडी बाजारातील दुचाकींच्या गर्दीमुळे बाजारसाठी जागा अपुरी पडु लागल्याचे चित्र आहे.
म्हसवडसह पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी व नागरीकांसाठी येथील अठवडी बाजार हा अतिशय महत्वाचा आहे, या बाजारवरच शहराचे अर्थकारण सुरु आहे या शिवाय येथील छोट्या, छोट्या व्यावसायिकांनाही याचाच खुप मोठा आधार आहे, माण तालुक्यात सर्वात मोठा अठवडी बाजार म्हणुनही म्हसवड शहरात भरणार्या अठवडी बाजारची विशेष ओळख आहे. हा अठवडी बाजार पालिका इमारतीसमोरील बाजार पटांगण याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरतो, तर बस स्थानक चौक ते विठ्ठल – रुक्मिणी मंदिर या दरम्यानच्या रोडवरीही मोठ्या प्रामाणावर छोटी, छोटी दुकाने अनेकजण लावत असतात, मात्र या दरम्यानच्या रस्त्यावर अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात त्यामुळे बुधवार म्हटले की येथे वाहतुक कोंडी ही ठरलेली असते, वाहतुक पोलीसही कोणीतरी फोन केल्यावर याठिकाणी येवुन ती वाहतुक कोंडी सोडवतात मात्र तो पर्यंत वाहतुक कोंडींंमुळे होणारे धुराचे प्रदुर्षण व कर्नकर्कश्य हॉर्नमुळे बाजारातील सर्वजणच हैरान होतात, तर दुचाकींची संख्या याठिकाणी मोठी असुन येथील अठवडी बाजारात येणारे छोटे, छोटे व्यापारी हे ज्या जागेत आपली दुकाने लावतात त्याच ठिकाणी आपली दुचाकी व चारचाकी वाहने लावत असल्याने इतर छोट्या व्यावसायिकांना आपली दुकाने लावण्यासाठी जागा शिल्लक रहात नाही, परिणामी अनेक शेतकर्यांना बाजारात जागा न मिळाल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजी पाला बड्या व्यापार्याला विकावा लागतो. या अठवडी बाजारात जर याच परिसरातील शेतकर्यांना जागा उपलब्ध होत नसेल तर ही मोठी खेदाची बाब आहे, यासाठी पालिका प्रशासनाने गंभीरपणे पाऊले उचलुन एक ही दुचाकी बाजार तळावर लावु देवु नये तर मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होणार नाही याची खबरदारी पोलीसांनी घेतल्यास निश्चितच म्हसवड शहराचा अठवडी बाजार हा आदर्श बाजार भरेल यासाठी पालिका प्रशासनाची व पोलीस प्रशासनाची मानसिकता फार महत्वाची आहे.

फोटो –

अक्कलकोट तालुक्यातील मैदरगी जवळ अपघात.४ भाविक ठार.

सोलापूर : वार्ताहर
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सुविचार अन् नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात केली जात आहे. राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून शिर्डी साईबाब, शेगावच्या गजानन महाराज, पंढरीच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या (Akkalkot) स्वामी समर्थ चरणी नततमस्तक होण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. मात्र, अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील या भीषण अपघातात 4 भाविक जागीच ठार झाले असून इतर 7 जण जखमी आहेत. यातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना घडली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करुन गाणगापूरकडे जात असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमीना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आहे.

जि.प. शाळेचे पोवाडा स्पर्धेत अतुलनीय यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी शाळा नंबर १ व ३मधील व
विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या वर्षी
पोवाडा स्पर्धा मध्ये अतुलनीय यश.

गोंदवले –
सातारा जिल्हा परिषद सातारा आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२४ अंतर्गत शाहिरी पोवाडा स्पर्धा
लहान गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं.१ व ३ चे सलग दुसऱ्या वर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय पोवाडा स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,विस्तार अधिकारी रमेश गंबरे ,केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड,मुख्याध्यापिका सुनिता यादव ,महादेव महानवर ,शिक्षिका केशर माने,मनिषा बोराटे,रश्मी फासे,रेखा जगदाळे ,मिनाक्षी दळवी,दराडे मॅडम,नम्रता चव्हाण,माया तंतरपाळे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष व सदस्य, पालक व ग्रामस्थ आदींनी कौतुक केले.यासाठी शिक्षक सागर जाधव विशेष परिश्रम घेतले तर विशाल इंगळे व सौरभ माने यांनी मार्गदर्शन केले.


छाया – पोवाडा सादर केलेले यशस्वी विद्यार्थी (विजय ढालपे)

error: Content is protected !!